कमळ फुलाचे मनोगत मराठी निबंध | कमळाचे आत्मकथन निबंध

नमस्कार मित्रांनो. आजच्या या सुंदर लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आत्मकथनात्मक निबंध तोही आपल्या मराठी मायबोलीत. आजच्या आत्मकथनात्मक निबंधाचा विषय असणार आहे कमळाचे मनोगत. आत्मकथनात्मक निबंध म्हणजे कोणतीही सजीव किंवा निर्जीव व्यक्ति तथा वस्तू जेव्हा प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत बोलते तेव्हा त्याला आत्मकथन किंवा मनोगत असे म्हटले जाऊ शकते. याप्रसंगी आपल्याला त्या सजीव किंवा निर्जीव वस्तू च्या जागेवर राहून सर्व दृष्टिकोनांनी विचार करावा लागतो. हा सर्वकाही एकंदरीत कल्पनाशक्तीचा खेळ आहे ज्यामध्ये आपण त्या जागी आहोत अशी कल्पना करून आपण संवाद साधू शकतो. अशाच प्रकारे आजच्या या लेखांमध्ये आपण कमळाचे आत्मकथन बघणार आहोत ज्यामध्ये जणू काय कमळच आपल्याशी बोलू लागले आहे असे भासते. चला तर मग बघुयात कमळाचे मनोगत.

कमळ फुलाचे मनोगत मराठी निबंध

कमळाचे मनोगत

अरे मित्रा मला असं तोडू नकोस रे, मी पाण्यात फुललेला असतानाच नाही का सुंदर दिसत. काय रे अचमित झालास. होय मी कमळ बोलतोय. मी सर्व फुलांपैकी एक अत्यंत सुंदर व कोमल फुल आहे. मला इंग्रजी मध्ये लोटस असे म्हणतात. व माझे विज्ञान शाखेचे नाव निलुम्बिया न्यूसिफेरा असे आहे. मी भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखला जातो आणि या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. माझे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मी चिखल असलेल्या पाण्यात उगवतो तरीदेखील मी स्वतः अतिशय स्वच्छ व मुलायम असतो. स्वच्छतेचा गुणधर्म खरंतर माणसाने माझ्याकडून शिकायला हरकत नाही असे मला वाटते. मी सुवासिक देखील आहे जेणेकरून माझ्या खुलण्याने आजूबाजूचा परिसर सुवासिक राहतो.

मला हिंदू धर्मात देखील बरेच प्राधान्य दिले जाते व मला पवित्र मानून अनेक पूजा व धार्मिक विधींमध्ये माझा वापर केला जातो. माझे अजून एक धार्मिक ओळख म्हणजे मी माता लक्ष्मीचे आणि सरस्वती यांचे आसन आहे. मी एक अतिशय सुंदर फुल असून माझी लागवड ही उबदार वातावरणात तळ्यात, तलावात, जलाशयांमध्ये केली जाऊ शकते. माझी पाने गोलाकार व पाण्यावर तरंगतील अशी असतात. मी साधारणतः 20 ते 30 सेंटीमीटर व्यासाचा असतो.            माझा एक अजून विशेष गुणधर्म म्हणजे मी शुद्धतेचे व समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आता तुम्हीच बघा ना मी चिखलात उगवून देखील स्वतः अगदी स्वच्छ व नितळ असतो. मी स्वतःला असे बनवले आहे की तो पाण्यातला चिखल देखील माझी सुंदरता कमी करू शकत नाही परंतु त्याला माझ्या वाढीसाठी मदत करावी लागते. माझा वापर उद्यानात, जलतरण तलावात व अनेक समारंभांमध्ये जेव्हा सजावटीसाठी केला जातो आणि तुम्ही सर्वजण मला बघून माझी प्रशंसा करता तेव्हा मला खूप छान वाटते.

परंतु माझी सुंदरता ही तलावात किंवा पाण्यातच उठून दिसते असे मला वाटते. माझा जीवन कालावधी अल्प म्हणजेच तीन ते चार दिवसांनी इतका असतो त्यानंतर मी बंद होऊन माझ्या फुलांचे रूपांतर बियांमध्ये होतो. याही पलीकडे जाऊन माझ्या बियांचा वापर हा अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

त्यानंतर मी तुम्हा मानवांना अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील प्रदान करतो. यामध्ये माझी फुलं बिया व मूळ ही विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. माझ्या फुलांसारखंच माझं मन देखील स्वच्छ आणि सुंदर आहे. मी उद्यानात असताना रोज लहान मुलांना माझ्या भोवती खेळताना बघून मला खूप आनंद होतो.

बरेच लोक माझी सुंदरता बघून माझे छायाचित्र देखील काढतात तेव्हाही मला छान वाटते. परंतु तुमच्यासारखी काहीजण घेऊन पटकन मला तोडून टाकतात तेव्हा मात्र मला वेदना होतात हे तुम्ही का बरं समजून नाही घेत. मला असं तोडण्यापेक्षा जर मला पाण्यात बघूनच माझ्या सुगंधाचा व सुंदरतेचा आनंद लुटला तर त्यात काय चूक आहे बरं. तुम्हीही खुश आणि मी ही खुश. आज तू भेटलास म्हणून मी तुझ्याजवळ मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

तू मला तोडू नयेस अशी इच्छा तर दर्शवलीच परंतु त्या पलीकडेही माझ्या बद्दलची काही उपयुक्त माहिती मी तुला देऊ केली. मला असे वाटते की तू माझ्या भावना नक्कीच समजून घेशील व मी आशा करतो की इथून पुढे जर तुला कोणी मला किंवा कोणत्याही कमळाच्या फुलाला तोडताना दिसले तर तू त्यांना नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न करशील व गरज भासल्यास त्यांना माझे महत्त्व देखील पटवून देशील.

तुझ्याशी इतक्या गप्पा मारून आता तर आपली किती छान मैत्री झाली आहे. तुला कधी कंटाळा आला की इकडे उद्यानात येऊन माझ्याशी गप्पा मारत जा तुलाही बरं वाटेल आणि मलाही ते आवडेल. चल तर मग आता तुला घरी जायला उशीर होत असेल भेटूया आपण परत कधी निवांत.

Leave a Comment